"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४७"
- dileepbw
- Sep 3, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४७"
©दिलीप वाणी,पुणे
प्रसंगविशेषी पॅथॉलॉजीस्टना उपचार देखील करावे लागतात बरं का ! जनकल्याण रक्तपेढीमधील HBsAg (Australia Antigen) Reactive रक्तदात्यांना "आरोग्यवर्धिनी" चे उपचार सुरु असल्याचे कळताच माझे बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागातील वर्गमित्र सुरेश डांगे व पत्की मला भेटायला आले.सर्व उपक्रम समजावून घेतला व त्यावर औषधशास्त्रीय संशोधन करू या असा प्रस्ताव मांडला.
हे औषधशास्त्रीय संशोधन पुढे वैद्यकीय नियतकालिकात प्रसिध्द झाले(Effect of 'Arogyavardhini' against carbon tetrachloride induced hepatic damage in albino rats S. V. DANGE, P. S. PATKI, V. M. BAPAT AND D. S. SHROTRI,Indian J Physiol Pharmacol.1987) व रूग्णसंख्या प्रचंड वाढली.
हे संशोधन वाचून University of California,San Francisco चे आंतरराष्ट्रीय किर्तीचे Hepatologist व Immunohaematolgist डाॅ.गिरीश व्यास हे खास मला भेटण्यासाठी अमेरिकेहून भारतात आले.तुटपुंज्या अर्थव्यवस्थेत "विनामूल्य" सुरू असलेला हा उपक्रम पाहून ते इतके भारावून गेले की त्यांनी अमेरिकेत परतताक्षणी American Red Cross शी संपर्क साधला व "सुसान फाऊलर" नावाच्या रेडक्राॅसच्या प्रतिनिधीला मला भेटायला पाठवले. दिवसभर रक्तपेढीचे व "आरोग्यवर्धिनी" या उपक्रमाचे बारकाईने निरीक्षण करून सुसानबाई अमेरिकेला परतल्या व एकच "जादू" झाली.काय असावी ?
अमेरिकन रेडक्राॅसकडून रक्तपेढीच्या आधुनिकीकरणासाठी लागणारी उपकरणे "न मागताच" एका पाठोपाठ एक माझ्या दारात येऊन पडू लागली."बायोसेफ्टी कॅबिनेट" ने सुरूवात झालेली ही मालिका "एफेरेसिस मशीन" पर्यंत जाऊन पोहोचली. F 16 विमान देशात येऊन पोहोचले खरे पण वैमानिकाला ते उडवता तर आले पाहिजे ना ? मग १९९० साली उडालो अमेरिकेला हे तंत्रज्ञान शिकायला !
Comments